

औरंगाबाद : शहरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस होत जाणारी वाढ आणि अवैध धंद्यांवर पोलिसांचे नियंत्रण न राहिल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमलेली गुन्हे शाखा, विशेष पथक अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न नागरिकांना पडत आहे. ही पथके प्रभावी कामगिरी करत नसल्याने पोलिस आयुक्तांनी एक ‘खास’ पथक नेमले आहे. हे पथक अस्तित्वात येताच शहरभरात अवैध धंद्यांची पाळेमुळे खणण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे ‘भरणा’ करणाऱ्यांच्या उरात मात्र धडकी भरली असून ते पुरते हादरले आहेत.
जिन्सी, सिटी चौक परिसरात सर्रासपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या विशेष पथकाने गुरुवारी(ता.आठ) धडक कारवाई केली. चार जुगार अड्ड्यांवर छापा मारून पथकाने १३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला. विशेष म्हणजे कारवाईत दुसऱ्या ठाण्यातील अधिकारी व मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. गुन्हेगार आणि अवैध धंदाचालकांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या जिन्सी आणि सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमाने सुरू असल्याचे गुरुवारी उघड झाले. गुन्हे शाखा आणि संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्रासपणे कल्याण मटका सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांना मिळाली होती. खबऱ्याने चक्क छायाचित्रीकरण करून जुगार अड्ड्याचा पुरावाच सादर केला होता. त्यामुळे पोलिस आयुक्त प्रचंड संतापले होते. त्यांनी गुन्हे शाखेच्या भरोशावर न राहता ‘खास’ पथक तयार केले आहे.
दोन जुगार अड्डे उद्ध्वस्त
पोलिस आयुक्त गुप्ता यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना जिन्सी हद्दीत छापा मारण्याचे सांगितले. सोनवणे यांच्या पथकाने कटकटगेट येथील आफताब ऊर्फ राजा यास मोबाईलवर कल्याण मटका जुगार खेळवताना अटक केली. त्याच्या ताब्यातून बारा हजार आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले तर शरीफ कॉलनीतील चिठ्ठ्यावर आकडे लिहून देणाऱ्या सहा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पाच हजारांची रोख रक्कम आणि सात मोबाईल असा ऐवज जप्त केला. कल्याण मटक्याचा बुकी इरफान हा सिल्लोड येथे राहत असल्याचे समोर आले आहे
सिटी चौक हद्दीत दोन अड्ड्यावर छापा
पोलिस आयुक्तांच्या दालनातील सहायक निरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने सिटी चौक हद्दीतील घासमंडी आणि चंपा चौकात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारून सहा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सात मोबाईल, ११ हजारांची रोख रक्कम असा ६२ हजारांचा ऐवज जप्त करत ठाण्यात गुन्हा दाखल केला.
(संपादन-प्रताप अवचार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.